मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्यातून पावसाने उसंत घेतली आहे. ऑगस्ट महिना तर अक्षरश: कोरडा गेला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, १९०१ नंतरचा सर्वाधिक कोरडा ऑगस्ट म्हणून यंदा नोंद करण्यात आली आहे. पाऊस नसल्याने यावर्षी दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भारतासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसलेय. ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त १६० मिमीच्या जवळपास पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०२३ हे मान्सून वर्ष १९०१ नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे.
१ जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्ट अखेरपर्यंत देशातील पावसाची तूट ९ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या २२ टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील १ जूनपासून सरासरीच्या १९ टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मराठवाड्यात सर्वात विदारक स्थिती
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे ५८ टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथे सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे.
Maharashtra Drought Less Rainfall 122 Year Record
Monsoon Weather Climate