मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र ही नाट्यपंढरी आहे. मराठी रंगभूमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारावी, एकाच छताखाली व्यवस्था व्हावी, यासाठी मध्यवर्ती अशी यंत्रणा तयार केली जाईल. त्यासाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती तसेच निधीची व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या गोविंद देवल बल्लाळ पुरस्कारांचे वितरण तसेच नूतनीकरण झालेल्या यशंवतराव चव्हाण नाट्य संकुलाच्या लोकार्पण समारंभात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अजित भुरे, शशी प्रभू, सतिश लटके, नरेश गडेकर, गिरीष गांधी, भाऊसाहेब भोईर, विजय चौगुले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नूतनीकरण झालेल्या नाट्य संकुलाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठी रंगभूमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. रंगभूमीनं आपल्याला अनेक हरहुन्नरी कलावंत दिले आहेत. या सर्वांनीच महाराष्ट्राची, मराठी रसिकांची आपल्या कलेच्या माध्यमातून मोठी सेवा केली आहे.
रसिकांनीही आपल्या रंगभूमी परंपरेवर, नाट्य चळवळीवर भरभरून प्रेम केलं आहे. मराठी रंगभूमी आणि मराठी रसिक जन, चोखंदळ नाट्यप्रेमी हे महाराष्ट्राचं संचित आहे. मराठी संस्कृतीचं वैभव आहे. मराठी मातीनं कला क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. या मातीत अन्य प्रांतातील, अन्य भाषांतील कला प्रकार-नाट्य प्रवाह रुजले, वाढले. त्यांनाही मराठी रसिकांनी आपलेसे केले आहे. जगभरात जिथे जातो तिथे आपण पाहतो, की सगळ्यांना सामावून घेणारा असा आपला महाराष्ट्र आहे. हे आपले ऐश्वर्य आहे. विष्णुदास भावे ते आचार्य अत्रे अशा मांदियाळीने अनेक बदलांत, स्थित्यंतरात मराठी रंगभूमीची परंपरा समृद्ध केली आहे. आपल्या नाट्यकर्मींनीही या क्षेत्रावर भरभरून प्रेम केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीची ओळख जनमानसात रुजावी यासाठी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा दिला आहे. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगल्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयही सुरु व्हावे यासाठी आपण प्राधान्य दिल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रयत्न आहे. आपली मुंबई बदलते आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतही कलावंतांचे योगदान मोठे आहे. कला क्षेत्रातदेखील मोठ्या संख्येने पडद्याच्या मागे राहून अनेक जण काम करत असतात. या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. यापुढेही नाट्यगृहांची स्थिती सुधारावी यासाठी आपण करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून जे-जे करता येईल, ते प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
आगामी शंभराव्या नाट्य संमेलनाचे आयोजनदेखील तितकेच भव्य-दिव्य व्हावे. त्यासाठी चांगले नियोजन करण्यात यावे, त्याला शासनस्तरावरून सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.