मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. अमरावती आणि वर्धा येथील महाविद्यालयासाठी जागा कालातंराने निश्चित करण्यात येईल. सध्या २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यांच्या प्रवेश क्षमता ३ हजार ७५० विद्यार्थी इतकी आहे. महाराष्ट्रात प्रति एक हजार लोकसंख्येमागे ०.७४ इतके डॉक्टरांचे प्रमाण आहे. तर देशपातळीवर हे प्रमाण ०.९० इतके आहे. या नऊ महाविद्यालयांसाठी ४ हजार ३६५ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्य शासनाने निवडलेल्या जिल्ह्यातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम आणि कार्यान्वयन आणि संबंधित रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई विकास बँकेची आर्थिक आणि तांत्रिक मदत घेण्यात येणार आहे. या संस्थांनी राज्य शासनाला पूर्ण सहकार्य करुन अर्थपुरवठा लवकर करावा, जेणेकरुन या महाविद्यालयांच्या उभारणीचे काम येत्या सहा ते सात महिन्यात सुरु होईल, याबाबतचे नियोजन करण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये तृतीयक वैद्यकीय सेवेची उपलब्धता सुधारणे, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालय उभारण्यावर भर देऊन वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करणे आणि शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण यांच्या आधारे सक्षम मानवी संसाधनाची उपलब्धता सुधारणे यावर येत्या काळात भर देण्यात येईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.