मुंबई – संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात मागील वर्षाप्रमाणेच यंदाही फेब्रुवारी ते मे दरम्यान सुमारे ४ महिने कोरोनाचा हाहाकार उडाला होता. आता काही प्रमाणात या संसर्गापासून राज्यातील सर्व जनतेला काहीसा दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे जाणवत असतानाच आता पुन्हा एकदा डेल्टा प्रकारच्या विषाणूमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या डेल्टा स्वरुपाचे संसर्ग झालेले ६६ रुग्ण सापडले असून त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णांपैकी काहींना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. राज्याच्या विविध भागातून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसींग टेस्टमध्ये ही प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस स्वरूपाच्या संसर्गामुळे ६३ वर्षीय महिलेच्या मृत्यूची पहिली घटना ही मुंबईत नोंदवली गेली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात या विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्या वृद्ध महिलेला कोविडविरोधी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. तसेच तिच्या मृत्यूनंतर त्या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या आणखी दोन लोकांनाही या विषाणूची लागण झाली. विषाणूचा हा प्रकार अत्यंत संक्रामक आहे.
डेल्टा प्लस प्रकाराची (फॉर्मची ) जास्तीत जास्त म्हणजे १३ प्रकरणे उत्तर महाराष्ट्रातील जळगावातून आली आहेत. त्याचवेळी, १२ प्रकरणे रत्नागिरीतून आणि ११ मुंबईतून आली आहेत. उर्वरित प्रकरणे इतर ठिकाणची आहेत. सर्वात भयाकन गोष्ट म्हणजे कोरोनाची दोन्ही लस घेतल्यानंतरही आता डेल्टामधून लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. विशेष म्हणजे आता कोरोना पुन्हा एकदा महाराष्ट्रात डोके वर काढत आहे. त्यात शुक्रवारी महाराष्ट्रात ६६८६ कोरोना रुग्ण आढळले असून १५८ लोकांचा मृत्यू झाला. यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६३,८२,०७६ असून मृतांची संख्या १,३४,७३० झाली आहे.