महाराष्ट्र दिनी विभागीय आयुक्तालयात होणार जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण
जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता होणार ध्वजारोहण
नाशिक – महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) व सदर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये 1 मे , 2021 च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेले आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिनाचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज (1 मे 2021 ) रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, रोड येथे सकाळी 8.00 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.
शासनाने या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8.00 वा . फक्त ध्वजारोहण विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त, नाशिक रोड, नाशिक येथे होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही. या ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड एवढेच पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत राहणार आहेत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी कळविले आहे.
तसेच यावेळी इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. कवायती / संचलन आयोजन करण्यात येणार नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील. याची दक्षता घेण्यात यावी, असेही श्री. भागवत यांनी कळविले आहे.