मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून विकासकामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
विद्यापीठाचे नियम, परिनियम व विनियम प्रकरणे तातडीने राज्यपाल यांच्याकडे सादर करावे, विद्यापीठाच्या संविधानिक पदभरतीबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करावा, विद्यापीठाच्या बांधकामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, हे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत दिले.
विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्र व उपकेंद्राकरिता जागा उपलब्ध करून घेणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये सायबर सेक्युरिटी स्कूल सुरू करणे आणि बांधकाम पूर्ण होत असलेल्या इमारतीचे भूमिपूजन करून तातडीने सुरू करणे याबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव सतीश तिडके, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव भगवान जोगी, अधिष्ठाता डॉ. संजय नलबलवार, अधिष्ठाता डॉ. सचिन पोरे, अभियंता विलास चव्हाण, कार्यकारी अभियंता श्री नामदे, विशेष कार्य अधिकारी प्रकाश आव्हाड आदी उपस्थित होते.
Maharashtra Cyber Security School Soon