नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या साहिल पारख व दिर्घ ब्रम्हेचा यांनी १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या त्रिपुरा संघावरील विजयात छान चमक दाखवली. सुरत येथे सुरू झालेल्या बीसीसीआयच्या विजय मर्चंट ट्रॉफीत डावखुरा सलामीवीर साहिल पारखने आपल्या नेहमीच्या तडाखेबंद शैलीत ६८ चेंडूत ११ चौकरांसह ६४ धावा फटकावल्या. तर पाचव्या क्रमांकावरील दिर्घ ब्रम्हेचाने ४६ चेंडूत ६ चौकरांसह ३५ धावांचे योगदान दिले. त्यासह अराहन सक्सेना ५८ , शुश्रुत सावंत ४३ ,नारायण डोके ३४ व कार्तिक शेवाळे ३३ यांच्यामुळे प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाच्या ३१३ धावा झाल्या. उत्तरादाखल त्रिपुराचा पहिला डाव ८८ धावांत गडगडला. महाराष्ट्र संघातर्फे कार्तिक शेवाळेने ६ तर सुशिक जगतापने ३ बळी घेतले. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावातही त्रिपुराला ११२ पर्यंतच मजल मारता आली. दुसऱ्या डावातही कार्तिक शेवाळेने परत ४ व शतायु कुलकर्णीने ४ बळी घेतले. त्यामुळे महाराष्ट्र संघाने ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
महाराष्ट्र संघाचा पुढील सामना ६ डिसेंबरला मध्य प्रदेश बरोबर होणार आहे.
या पहिल्याच सामन्याच्या विजयातील दोन्ही उदयोन्मुख कुमार क्रिकेट खेळाडूंच्या कामगिरी मुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे या क्रिकेटपटूंचे कौतुक करून स्पर्धेतील यापुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.