मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दररोज शेकडोने वाढणाऱ्या कोरोना बाधितांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा काहीच परिणाम दिसून येत नसल्याने आता आणखी कडक निर्बंध लागू होणार आहेत. आज येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील नवी नियमावली थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यास आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील कोरोना संसर्ग, आढावा, तयारी आणि उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे येथे प्रचंड स्वरुपात रुग्ण आढळत आहेत. दररोज शेकडोने संख्या वाढत असल्याने ही बाब चिंता करायला लावणारी आहे. आणखी निर्बंध कठोर केले नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळेच सध्याच्या निर्बंधांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्याचे या बैठकीत निश्चित झाले आहे. या बैठकीचा अहवाल आणि नवी कोरोना नियमावली ही मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यास मंजुरी मिळताच ती प्रसिद्ध केली जाणार आहे. आज दुपारपर्यंत ही नियमावली जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात लॉकडाऊन न लावता अन्य उपाययोजना करण्यावर आजच्या बैठकीत गांभिर्याने चर्चा झाली आहे. लॉकाडऊनमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय अन्य कडक निर्बंध लादून कोरोना संसर्गाची साखळी कशी तोडता येईल आणि कोरोनाला अटकाव कसा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली आहे. गर्दीचे प्रमाण कसे आणि कुठे कमी करता येईल, यावर भर देण्याचे निश्चित झाले आहे. सध्या विवाह सोहळे, अंत्ययात्रा आणि सामाजिक कार्यक्रमांवर उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यावर आणखी अंकुश येण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा मात्र सुरूच राहणार आहे. सरकारी कार्यालयांच्या उपस्थितीबाबत मात्र काही निर्णय होण्याची चिन्हे आहेत.