मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाने कोरोना निर्बंधांबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून लागू करण्यात आलेले कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा आणि मिरवणुका काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात आपत्ती व्यवस्थापन, तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावलेले निर्बंध #गुढीपाडवा पासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घोषित केले. त्यांनी राज्य मंत्रिमंडळातर्फे जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या pic.twitter.com/S8VRKDHwDa
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 31, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. त्यात प्रामुख्याने कोरोना निर्बंधांबाबत चर्चा करण्यात आली. सर्वच मंत्र्यांनी हे निर्बंध हटविण्याची मागणी केली. त्यामुळे एकमताने मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. २ एप्रिलपासून राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटविले जाणार आहे. या निर्णयामुळे एप्रिल महिन्यातील गुढीपाडवा, रमजान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी यासह विविध सण आणि उत्सवांच्या साजरे करण्याला कुठलीही बंधने राहणार आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात विविध सण उत्सव हे निर्बंधांद्वारेच साजरे करण्यात आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार आहे.
दरम्यान, मास्कची सक्ती राज्यात राहणार नाही. ज्यांना मास्क वापरायचा आहे ते वापरु शकतील. तेच, ज्यांना वापरायचा नाही त्यांना कुठलेही बंधन असणार नाही. म्हणजेच, मास्कचा वापर हा ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.