मुंबई – राज्यातील कोरोना निर्बंध शिथीलतेबाबत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोना संसर्ग कमी असणाऱ्या राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील होणार आहेत. तर ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. तसे, डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य टास्क फोर्सच्या बैठकीनंतर डॉ. टोपे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य टास्क फोर्सची बैठक आज झाली. राज्यात ४ कोटीहून अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात मृत्यू आणि संसर्ग दर कमालीचा घटला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याच्या तयारीत आहे. याबाबत जिल्हा पातळीवरुन विविध प्रकारची माहिती आरोग्य विभागाने मागवून त्याचा प्रस्ताव सादर केला. त्यावत चर्चा करण्यात आली. त्यानुसार २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील केले जाणार आहेत. निर्बंध शिथील झाल्यानंतर कोरोना संसर्ग वाढला तर पुन्हा निर्बंध लावण्यात येतील. यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसे, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. त्यावरही ते अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या जिल्ह्यांना दिलासा नाही
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांच्याही खाली आहे. तेथे कोरोना निर्बंध शिथील होणार आहेत. मात्र, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, बीड, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अद्यापही संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
ही सूट मिळणार
राज्यातील २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील होताना सोमवार ते शनिवार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. केवळ रविवारी पूर्णपणे बंद असणार आहे. ज्या दुकाने आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण झाले आहे तेथे ५० टक्के सुरू राहण्यास मुभा देण्यात येणार आहे. दुकाने, रेस्टॉरंट, सिनामागृहे, शो रुम्स यांना अटीशर्थी घालून परवानगी मिळणार आहे, असे टोपे यांनी सांगितले आहे.
उत्तर महाराष्ट्राला दिलासा
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील होणार आहेत. मात्र, अहमदनगर येथे निर्बंध कायम राहणार आहेत. दरम्यान, निर्बंध शिथील झाले तर कोरोनाचे नियम पाळावेच लागतील, असे डॉ. यांनी बजावले आहे.