विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातला कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेख सात लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचून उतरणीला लागला असल्याचं चित्र आहे. २२ तारखेला राज्यात ६ लाख ९९ हजार आठशे ५८ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात घट होत आज ही संख्या ६ लाख ७४ हजार सातशे ७० वर आली आहे.
राज्यात काल तब्बल २० दिवसांनी कोरोना बाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढही पन्नास हजारांच्या खाली आली. मात्र चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाणही कमी होत असलं तरी ते अजून २० टक्क्यांच्या खाली आलेलं नाही.
५ एप्रिलला ५० हजाराच्या पुढे गेलेली रुग्णसंख्येतली दैनंदिन वाढ २० तारखेपासून तर रोजच ६० हजारांच्याही पुढे होती. काल राज्यात ४८ हजार ७०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ७१ हजार ७३६ रुग्ण बरे झाले.
काल पाचशे २४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत २२ हजार ५१२ इतकी घट झाली आहे. राज्यात आतापर्यंतच्या ४३ लाख ४३ हजार ७२७ बाधितांपैकी ३६ लाख १ हजार ७९६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ पुर्णांक ९२ शतांश टक्के आहे. कोविड १९ मुळे आतापर्यंत दगावलेल्या रुग्णांची संख्या ६५ हजार २८४ झाली असून राज्यातला मृत्यूदर आता दीड टक्के आहे.