मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महा विकास आघाडी सरकारमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे दिसत आहे. या तिन्ही पक्षातील काही नेते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे सरकारमध्ये तणाव निर्माण होत असल्याचे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने दिसून येत आहे. विशेषत : काँग्रेस पक्षातील काही नेते वादग्रस्त वक्तव्य करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे महा विकास आघाडी सरकारमध्ये कायमच बिघाडी असल्याचे विरोधी पक्षाचे नेते नेहमीच म्हणत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव दुकान बंद होईल असे म्हटले आहे. पंढरपूरची जागा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलडाण्यातील एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भात मोठ दुकान नाही, त्यामुळे ते बंद होईल, असे म्हणता येणार नाही, असे देखील पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया येते आहेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेले तिन्ही घटक पक्ष अनेक प्रसंगी एकमेकांवर निशाणा साधत आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवाची खिल्ली उडवली असून, विदर्भातील ‘त्यांचे दुकान’ लवकरच बंद होणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संयुक्त सरकार असून तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरील नेते एकमेकांमध्ये समन्वय साधत सरकार चालविण्याचा आणि वाचविण्याचा प्रयत्न करत असताना काही नेते मात्र वारंवार या खोडा घालण्याचे काम करीत आहेत. त्यात नाना पटोले यांचा वरचा क्रमांक लागतो असे म्हटले जाते. आता देखील वर्धा येथे काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पटोले म्हणाले की, पंढरपूर विधानसभेची जागा वाचवण्यात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेतृत्व अपयशी ठरले. आता विदर्भात दुकान बंद व्हायला किती वेळ लागेल. त्या नंतर त्यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला विदर्भात मुळीच आधार नाही म्हणून मी असे बोललो.
अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीत फूट पडली होती. राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष यापुर्वी पोटनिवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. अकोल्यात निवडणुकीच्या शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले , तर काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा देत उमेदवार उभे केले होते. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यामध्ये काँग्रेस केवळ सहयोगी पक्ष म्हणून काम करताना दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हेच सरकार चालवण्याच्या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचे महत्व कमी करतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आमच्या पक्षाची वोट बँक आपल्याकडे खेचण्यात प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.