इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासून अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना या पदावर संधी देण्यात आली आहे. हर्षवर्धन यांच्या नियुक्तींमुळे महाराष्ट्रात काँग्रेसला नवी भरारी मिळेल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.
सपकाळ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॅाम व बी.पी.एड पदवी धारण केलेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या २५ वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. १९९९ ते २००२ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेले होते.
