मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तेतील एन्ट्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री झाल्याबरोबर शिंदे व त्यांच्या गटात कमालीची नाराजी पसरली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बुधवारी रात्री झालेली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी पक्षातील आमदार, खासदारांची बैठक घेतली. ही बैठक पक्षातील असंतोष शमविण्यासाठी आणि भविष्यातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी होती. या बैठकीत सर्व आमदार-खासदारांनी कमालीची नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी सत्तेत आल्याने आपले काय होईल, अशी चिंताही व्यक्त केली. त्यावर शिंदेंनी आपल्यालाही काहीही फरक पडणार नसल्याचे सांगितले. ‘भाजपसोबत आपली युती वैचारिक पातळीवर झालेली आहे आणि आता झालेली युती ही केवळ राजकीय तडजोड आहे’, असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या एन्ट्रीवर व्यक्त केले आहे.
या युतीमुळे घराणेशाही संपुष्टात येईल, कारण आता ठाकरे व पवार या दोन कुटुंबांना बाजुला ठेवून राज्यात एकत्र आलेल्या लोकांचे सरकार आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या नेत्यांना केले. आपण चर्चांवर आणि इकडच्या तिकडच्या घडामोडींवर लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे. राज्यात आपली लोकप्रियता वाढत आहे. अशावेळी आपण पक्ष वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे, असेही ते या बैठकीत म्हणाले.
चिंता नाही, राजीनामा नाही
अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे आपण चिंता करण्याचे काहीच कारण नाही. मी राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. ही अफवा कुणी पसरवली आहे, हेही मला माहिती आहे. आपण त्याची काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे.
५० जागा जिंकायच्याच
येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला ५० जागा लढवायच्या आहेत आणि त्या सर्व जागा जिंकायच्याही आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच आमदारांची टीम तयार करून आपल्याला कामाला लागायचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले यश महत्त्वाचे आहे, असेही ते नेत्यांना म्हणाले.
काम झाले नाही तर मला सांगा
आपली कामे झाली नाही तर मला सांगा. सरकारमध्ये असताना कामे झालीच पाहिजे. नव्या पॉलिटिकल एड्जस्टमेंटची काळजी करून आपली कामे होणार की नाही, याचा विचार करू नका. अडचण आली तर थेट माझ्यासोबत बोला, असेही शिंदेंनी नेत्यांना सांगितले.