माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
मुंबईसह कोकण वगळता आज सोमवार दि.१३ ते गुरुवार दि.१६ फेब्रुवारी (पुढील ४ दिवस) पर्यंत उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किमान तापमानात घट होईल. त्यामुळे काहीशी थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते. मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांपेक्षा मराठवाडा व विदर्भात कदाचित या थंडीचा प्रभाव काहीसा अधिकही जाणवू शकतो. दुपारचे कमाल तापमान सरासरी किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक राहून महाराष्ट्रात दिवसाचे वातावरणातील उबदारपणा हा अजूनही जाणवणारच आहे.
नाशिकसह खान्देशातील सर्व जिल्ह्यात ताशी १५-२० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवेतील गारवा तेथे अधिक जाणवू शकतो. शुक्रवार दि. १७ फेब्रुवारीपासून थंडी काही दिवसासाठी जरी काहीशी कमी भासली तरी महाराष्ट्रात अजूनही लघु दिवसांच्या कालावधीचे थंडीचे आवर्तने अवतरतीलच. उत्तर भारतात एकापाठोपाठ पाठलाग करणारी पश्चिम झंजावाताची साखळी चालूच आहे. त्यामुळे भले तीव्रता कमी जाणवली तरी शेत पिकासाठी फायद्याची थंडी महाराष्ट्राला मिळणारच आहे. तेव्हा थंडी गेली असे समजू नये.
निरभ्र आकाश व स्वच्छ सूर्यप्रकाशसहित आल्हाददायक थंडीचे वातावरण सध्या जाणवणार आहे. पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. काही ठिकाणी भलेही कांदा, द्राक्षे, गहू हरबऱ्यावरील काहीसा जाणवलेला बुरशी, मावा, किडीचा प्रादुर्भाव येणारे वातावरणच प्रतिबंध करील असे वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकंदरीत कोणतीही धास्ती मनी बाळगू नये, असे वाटते.
आज इतकेच विशेष!
Maharashtra Climate Weather Forecast in this Week