मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुख्य सचिवपदी श्री.सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.सौनिक येत्या रविवारी मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून पदभार स्वीकारतील. श्री.सौनिक सध्या वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी आहेत.
श्रीवास्तव उत्तर प्रदेशचे
मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव हे दि. ३० एप्रिल २०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्री. श्रीवास्तव हे दि. १ मार्च २०२२ पासून राज्याच्या मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. ते मूळचे उत्तरप्रदेशातील असून १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मनु कुमार श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर व नागपूरचे जिल्हाधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले. नगरविकास तसेच महसूल व वन विभागांतील त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय अशी होती. मुख्य सचिव म्हणून कार्यरत असताना, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी सहानुभूतीपूर्वक हाताळले. राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी “महाउत्सव २०२२” भव्यदिव्य कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीत आयोजित करण्यात आला.
सौनिक बिहारचे
श्री.सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्तपदी काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणून काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
Maharashtra Chief Secretary Manoj Saunik Appointed