महाराष्ट्राला भारतातील पहिली ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष
मुंबई – राज्यातील निर्यात वाढविण्यासाठी व जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने दक्षिण कोरिया, तैवान, आणि थायलंडमध्ये दौरे केले. तसेच विविध देशातील आंतरराष्ट्रीय संघटना व चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर २७ सामंजस्य करार केले आहेत. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सहा विभागात ६ ऍग्रोबेस क्लस्टर, महिला क्लस्टरची लवकरच स्थापना करून स्थानिक व्यापार उद्योगांना उत्पादनांची निर्यात करण्यासाठी चालना देण्यात येणार आहे. राज्यातील व्यापार-उद्योगांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर कटिबद्ध असून महाराष्ट्राला भारतातील पहिली ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
भारत -लिमा (पेरू आणि बोलिव्हिया) दूतावास, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इंडिया-पेरू चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी गुरुवार दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आभासी चर्चासत्र झाले. याप्रसंगी पेरू आणि बोलिव्हियातील भारताचे राजदूत मंदारापु सुब्बारायुडू, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अन्बलगन, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, फिक्कीचे संचालक गजेंद्र बडगुजर, इंडिया पेरू चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहित राव यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्यामधील व्यापार व्यवसाय वाढावा, महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढावी, नवीन व्यापार उद्योग यावेत यासाठी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र चेंबरने राज्यातील उद्योगांच्या वाढीसाठी स्पर्धात्मकता अधिक सुलभ करण्यासाठी उद्योग, धोरणकर्ते, बँक, वित्तीय संस्था आणि बहुपक्षीय एजन्सीसह विविध भागधारकांमधील चर्चा सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. तंत्रज्ञान अद्यावत करण्यापासून ते तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, नवीन युगातील विपणन ते नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा मिळणे, उदयोगांची क्षमता वाढविण्याचे कार्य विविध कार्यक्रमांद्वारे केले आहे. भारत -लिमा (पेरू आणि बोलिव्हिया) व्यापार उद्योगांसाठी द्विपक्षीय करार झाला असून यामध्ये अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. यामुळे निश्चितच व्यापार उद्योगांच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील आणि व्यापारात भागीदारी निर्माण करण्यास मदत होईल. करोना महामारीमुळे जागतिक स्तरावर व्यवसायांवर मोठा परिणाम झाला असून आता परिस्थिती सामान्य होत आहे. महाराष्ट्र, पेरू आणि बोलिव्हियामध्ये व्यवसाय वृद्धीच्या संधी असून त्याचा फायदा निश्चित सर्वांना होईल अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली.
पेरू आणि बोलिव्हियातील भारताचे राजदूत मंदारापु सुब्बारायुडू यांनी महाराष्ट्र, पेरू, बोलिव्हियामध्ये व्यापार, उद्योगांची व माहितीची देवाण घेवाण होऊन उपलब्ध संधीचा फायदा महाराष्ट्र, पेरू, बोलिव्हिया मध्ये व्यापारी, उद्योजक घेतील व दोन्ही देशात व्यापार व्यवसाय वाढेल गुंतवणूक होईल अशी आशा व्यक्त केली. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अन्बलगन यांनी राज्यात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. तसेच राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले. फिक्कीचे संचालक गजेंद्र बडगुजर यांनी चित्रफितीद्वारे अभियांत्रिकी वस्तू, वस्त्रोउद्योग आणि फार्मासिटिकल्स या क्षेत्रात असलेल्या विविध संधीची माहिती दिली. इंडिया पेरू चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहित राव यांनी पेरू येथे असलेल्या व्यापार उद्योगांच्या संधीची माहिती दिली. महाराष्ट्र व पेरूमध्ये निश्चित व्यापार उद्योग वाढेल अशी खात्री असल्याचे सांगितले. गॅब्रीया यांनी पेरू आणि बोलिव्हिया मध्ये व्यापार उद्योगांसाठी असलेल्या विविध संधीची सविस्तर माहिती चित्रफितीद्वारे दिली. चर्चासत्रास मनप्रीतसिंग , महाराष्ट्र चेंबरचे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता उपस्थित होते.