मुंबई – महाराष्ट्रात राज्य सरकारने लागू केलेल्या कोरणा प्रतिबंधक नियमांमध्ये काही सुधारणा करून लग्न व अन्य सार्वजनिक समारंभामध्ये ५० टक्के क्षमतेने उपस्थिती साठी तसेच शाळा व शैक्षणिक संस्था ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र चेंबर तर्फे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांच्या सचिवांना चेंबर तर्फे निवेदन देऊन यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात भूमिका मांडताना ललित गांधी यांनी म्हटले आहे की लग्नसमारंभ, सभा, सामाजिक कार्यक्रम, सेमीनार्स इ. साठी ५० जणांची मर्यादा निश्चित केली आहे. अशा प्रकारच्या आयोजनांवर इव्हेन्ट ऑर्गनायझर्स, कॅटरर्स, टेन्ट कॉन्ट्रॅक्टर्स, डेकोरेटर्स, बँडवाले इत्यादी अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबुन आहे. ५० जणांच्या मर्यादेमुळे हे सर्व व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याचवेळी चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स इ. ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच धर्तीवर अशा समारंभानाही ५० टक्के क्षमतेने अथवा जास्तीत जास्त २०० उपस्थितीच्या मर्यादेत यापैकी जे कमी असेल त्या संख्येने समारंभ/कार्यक‘म आयोजित करण्यासाठी परवानगी असणे आवश्यक आहे.
ललित गांधी यांनी शाळांच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, शाळा-महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात ऑनलाईन पध्दतीने शाळांचे वर्ग चालविण्यात आले त्याचा फार मोठा दुष्परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर, मानसिक अवस्था व व्यक्तिगत जीवनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतील निर्बंध उठवुन शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन पध्दतीने शिकलेला अभ्यासक्रम विसरला असल्याचे ७० टक्के विद्यार्थ्यांनी नमुद केले. अनेक विद्यार्थी मोबाईल वापराच्या आहारी गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना काऊन्सीलिंग वैद्यकीय उपचारांची गरज पडत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये दृष्टीविकार निर्माण झाले आहेत. अनेक प्राथमिक, उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी पॉर्न फिल्म्सच्या आहारी गेल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच ८ वी च्या पुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्णत्वाकडे आहे. तरी ५० टक्के क्षमतेने शाळा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची आग्रही मागणी आहे. देशाच्या भावी नागरीकांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व सामाजिक दुष्परिणाम रोखण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय तात्काळ घेणे आवश्यक आहे. मद्यालये सुरू व विद्यालये बंद असे विदारक चित्र निर्माण होत आहे ते बदलणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या पालनासाठी आम्ही कटीबध्द आहोत. मात्र अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था सुरळीत चालु राहण्यात मदत होणेसाठी वरील दोन सुधारणांचे आदेश तात्काळ निर्गमित व्हावेत अशी अपेक्षाही ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे