मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आज गाठला गेला. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांनी आपला राजीनामा दिल्याने, घटनेनुसार वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई मुख्य कार्यालयात प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
गेल्या अनेक दिवसांपासून सभासदांमध्ये कारभारातील भोंगळपणा, अपारदर्शकता आणि मनमानी निर्णयांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत होती. संस्थेच्या भविष्याबाबत असलेली अस्वस्थता कमी करण्यासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह नेतृत्वाची गरज होती. या पार्श्वभूमीवर सभासदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ठाम आवाज उठवला की रवींद्र माणगावे यांनी संस्थेची धुरा हाती घ्यावी.
या मागणीला मॅनेजिंग कमिटी व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांचा ठोस पाठींबा लाभला. विशेषतः माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर यांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या हितासाठी हा बदल घडवून आणला. शेवटी मॅनेजिंग कमिटी आणि सेक्रेटरी जनरल यांनी ललित गांधी यांचा राजीनामा स्वीकारला आणि रवींद्र माणगावे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून अधिकृत नेमणूक झाली.
याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक परब, उपाध्यक्ष शंकर शिंदे, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन अंजु सिंघल, कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश अग्रवाल, वेदांशू पाटील, मनीष पाटील, सरकार्यवाह श्रीमती शितल पांचाल, माजी सरकार्यवाह सुरेश घोरपडे, उपसचिव नितीन शेलार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली जिल्ह्याचा अभिमान
रवींद्र माणगावे हे सांगली जिल्ह्यातील सावळवाडी गावचे रहिवासी. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि आपल्या कुटुंबातील पहिले उद्योजक म्हणून त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवले. महाराष्ट्र चेंबरमध्ये सदस्य, कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे सांगली जिल्ह्याला प्रथमच महाराष्ट्र चेंबरच्या सर्वोच्च पदाचा मान मिळाला आहे.
सभासदांचा विश्वास – भविष्यातील वाटचाल
सभासद आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रवींद्र माणगावे हे एक सुसंस्कृत, प्रामाणिक, दूरदृष्टी असणारे आणि कणखर नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था पारदर्शकतेकडे वाटचाल करेल, प्रत्येक सभासदाचा सन्मान राखला जाईल आणि महाराष्ट्र चेंबरची प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल.
नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर रवींद्र माणगावे यांनी सभासदांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी संस्थेच्या भावी वाटचालीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना प्राधान्य देऊन संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या आदर्शांनुसार संस्था उभारण्याचे वचन दिले.