मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार टिकणार की नाही, काही दिवसातच कोळसणार यासह विविध प्रकारच्या चर्चा झडत असताना राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या विस्ताराबाबत साशंकता घेतली जात आहे. मात्र, आता या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रकारचे वाद सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतात की काय? अशा चर्चांना सुरु असताना आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू झाली आहे कारण तशी शक्यता देखील व्यक्त होत आहे. आता मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे. या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता असून यामध्ये शिंदे गटातील काही आमदारांना आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात सत्तांतर होऊन सुमारे ४ महिने होत आले तरी नव्या सरकारचं दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. त्यामुळे सर्वच पक्षाच्या विरोधकांकडूनही राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता राज्य सरकारनेच याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व ५० आमदार आणि खासदारांसह येत्या २६ नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार असून कामाख्यादेवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परतल्यावर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तसेच मंत्रिमंडळ विस्तारात आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज होणाऱ्या आमदारांना महामंडळ देण्याचा शिंदे सरकारचा विचार आहे.
राज्य मंत्रिमंडळात साधारणतः चार आमदारामागे एक मंत्रिपद या प्रमाणे शिंदे गटाला १२ ते १३ मंत्रिपदे मिळू शकतात. तर उर्वरित मंत्रिपदे भाजपच्या वाट्याला येतील. शिंदे आणि भाजपकडून छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल. आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदारांना मंत्री म्हणून संधी दिली जाईल. मात्र, दोन्ही गटाकडून धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. अशावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते असेही ही म्हटले जात आहे. गुवाहाटीहून आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत आतापर्यंत विरोधकांकडून दिले जात होते. पण आता सत्ताधारी पक्षातीलच ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विधान केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात कधी काय होईल काहीच भरोसा नाही. महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे विरोधकांच्या हाती आणखी एक मुद्दा आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकार शंभर टक्के कोसळणार असल्याचे विधान केले आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला सरकार स्थापन झाल्यानंतर महिना लागला होता. त्यानंतर तब्बल महिन्याहून अधिक काळ राज्याला मंत्रिमंडळ नव्हते. दोघेच जण सरकार चालवत होते. त्यानंतर महिन्यानंतर भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही २० ते २२ मंत्रिपदे शिल्लक आहेत. या मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. ज्या आमदारांना या मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही, त्या आमदारांच्या नजरा आता पुढील मंत्रिमंडळाकडे लागल्या आहेत. तसेच पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे. याशिवाय मंजुळा गावित, भरत गोगावले, बच्चू कडू, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम , प्रताप सरनाईक यांचीही नावे चर्चेत आहेत.
Maharashtra Cabinet Second Expansion Politics
Shinde Fadanvis Government