मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर झाल्या आणि त्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांकडून मंत्रालयातील चांगली अंतर्गत सजावट असलेल्या दालनांचा तसेच चांगल्या बंगल्यांचा शोध सुरू होता. त्यासाठी मंत्र्यांकडे काम करणारे त्यांचे खासगी पीए किंवा येऊ घातलेले खासगी सचिव कामाला लागले होते. काही मंत्र्यांना मंत्रालयासमोर असलेल्या बंगल्यांपैकी बंगला हवा आहे, तर काही जणांना मलबार हिल इथल्या प्रशस्त बंगल्यांपैकी एक बंगला हवा होता. त्यातही रामटेक, पर्णकुटी, रॉयल स्टोन हा बंगल्यांसाठी अनेक जण आग्रही असल्याचे समजते. एका मंत्र्याने तर बंगला वितरित होण्यापूर्वीच मंत्रालयासमोरील एका बंगल्यात आपले सामान आणून ठेवल्याची चर्चा आहे. अखेर आता मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहे.
बंगले आणि दालनाचे वाटप ज्येष्ठतेनुसार करण्याचे शिंदे सरकारने ठरविल्याचे समजते. १८ मंत्र्यांपैकी शिंदे गटातील सहा मंत्री यापूर्वीही मंत्रिमंडळात होते. त्यामुळे त्यांच्याकडे बंगले आणि दालन आहे. यातील केवळ राज्यमंत्री असलेल्या आणि आता कॅबिनेट मंत्री झालेल्या मंत्र्यांना चांगले दालन आणि बंगला हवा होता . तर पूर्वी जे मंत्री नव्हते अशा १२ मंत्र्यांना दालन आणि बंगले वितरित करायचे आहेत.
शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापनेपासून अगोदरच विस्तारासाठी उशीर झाला होता, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली होती. त्यानंतर, मंत्र्यांच्या खातेवाटपाला होत असलेल्या दिरंगाईवरुनही शिंदे सरकारवर टिका करण्यात आली.
आता मात्र, हळु हळु शिंदे सरकार आता एक एक स्टेप पुढे जाताना दिसून येत आहे. शिंदे सरकारमधील नवनियुक्त मंत्र्याना आता बंगल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले असून आता विधानसभेत खडाजंगी होत आहे. विधिमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तसेच, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहटी ट्रीप व गद्दारी या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे सरकारकडून हळुवारपणे पुढील रणनिती आखली जात आहे. शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाईसाठी आता खंडपीठ नेमण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे, आता ही लढाई आणखी पुढे काही दिवस चालणार आहेत.
आज नवीन मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले. त्यानुसार, मंत्री उदय सामंत यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर, वादग्रस्त ठरलेल्या मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगल्यावर स्थान मिळालं. तसेच शिंदे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला मिळाला असून दिपक केसरकर यांना रामटेक बंगला मिळाला आहे. अब्दुल सत्तार यांना पन्हाळगड (ब7) हा बंगला मिळाला आहे. तर, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लोहगड या बंगल्याची चावी मिळाली आहे. तर राधाकृष्ण विखेपाटील रॉयलस्टोन बंगल्यावर राहणार आहेत.
विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत.
श्री. राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन),
श्री. सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी),
श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड),
श्री. विजयकुमार गावीत (चित्रकुट),
श्री. गिरीश महाजन (सेवासदन),
श्री. गुलाबराव पाटील (जेतवन),
श्री. संजय राठोड ( शिवनेरी),
श्री. सुरेश (भाऊ) खाडे (ज्ञानेश्वरी),
श्री. संदिपानराव भुमरे (ब-२ (रत्नसिंधु),
श्री. उदय सामंत (मुक्तागिरी),
श्री. रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड),
श्री. अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड),
श्री. दीपक केसरकर (रामटेक),
श्री. अतुल सावे (अ-३ (शिवगड),
श्री. शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड)
श्री.मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग).
Maharashtra Cabinet Ministers Bungalow Allocation