मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या (२५ नोव्हेंबर) होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ते उपचारार्थ रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठक होणे नितांत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. तशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे हे प्रत्यक्ष उपस्थित राहतात की ऑनलाईन पद्धतीने की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देणे, शाळा पुन्हा सुरू करणे, एसटी महामंडळाचा संप यासह विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली दोनदा बैठक
यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या दोन बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या आहेत. एप्रिल २०२० मध्ये झालेल्या या बैठका होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसारच या बैठका झाल्या होत्या. यातील एका बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करण्याचा ठराव करण्यात आला. तो ठराव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला.
पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत उद्या होणाऱ्या (२५ नोव्हेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत मा. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनंतर निर्णय घेण्यात येईल.
तसेच कोवॅक्सिन ही लस लहान मुलांना देण्यास अडचण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा – @rajeshtope11— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 24, 2021