मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. मुख्यमंत्री शिंदे हे तीन दिवसांच्या रजेवर काश्मीरमध्ये पर्यटनाला गेले होते. ते काल रात्री सहकुटुंब मुंबईत परतले. त्यानंतर आज सकाळीच शिंदे मंत्रालयात आले आणि मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव मनोजकुमार सौनिक यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, प्रधान सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घमासान चर्चा झाली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघात म्हणजेच सिल्लोडमध्ये ८५० रुपयांची कापसाच्या बियाण्यांची बॅग तब्बल २३०० रुपयांना विक्री होत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. याची गंभीर दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत पथके तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.
बियाणे विक्रेते योग्य बियाणे, योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले.
Maharashtra Cabinet Meet Topic Discussion