मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसात राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. रविवारी १ हजार ४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला. त्यामुळे आता पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. याविषयी निर्णय घेण्यासाठी आज (दि. ६) दुपारी ४ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कोरोनाबरोबरच राज्यसभेच्या निवडणुकीसह अन्य महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. कोरोनाचे आव्हानही राज्यासमोर पुन्हा निर्माण झाले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. दोन महिन्यांपूर्वीच कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मास्कसक्ती हटवण्यात आली होती. त्यामुळे राज्यवासियांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आता मात्र पुन्हा संख्या वाढत असल्याने मास्कसक्ती लागू करावी का, या विषयावर चर्चा आजच्या बैठकीत केली जाईल. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
राज्यसभा निवडणूक हादेखील या बैठकीतला महत्त्वाचा मुद्दा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्ष आमदारांशी संवाद साधणार आहे. राज्यसभेच्या येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने मतदान करा असे आवाहन त्यांच्याकडून केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी सहा जागा आहेत. त्यासाठी सात उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यांच्यात चुरस वाढली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येक एक उमेदवार निवडून येणार हे निश्चितपणे दिसून येत आहे. तर भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस आहे. उमेदवाराला निवडून येण्यासाठी ४२ मतं आवश्यक असून छोटे पक्ष, अपक्ष यांच्यावर भिस्त आहे. याबाबतही आजच्या बैठकीत महाविकास आघाडी चर्चा करणार आहे.