मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होत आहे. या बैठकीत ओमिक्रॉनचा वाढत चाललेला धोका, त्याचा शाळा सुरू करण्यावर होणारा परिणाम, एसटी कर्मचारी आंदोलन आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहतात की दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाळा सुरू करण्याबद्दल पुनर्विचार
जगासह देशभरात ओमिक्रॉनचा धोका वाढला असून, राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण कमी असले तरी त्याच्या प्रासाराचा वेग अधिक असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यावर पुनर्विचार होऊ शकतो. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. मुंबई आणि पुण्यात १५ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. तर नाशिक, औरंगाबादमध्ये दहा तारखेनंतर निरीक्षण करून याबद्दल निर्णय होणार आहे.
एसटी कर्मचारी आंदोलन
एस महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरू केलेल्या एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला एक महिन्याच्यावर काळ लोटला आहे. राज्यातील अनेक भागात एसटी सेवा पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. राज्य सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला तरी काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओबीसी आरक्षण स्थगितीवर चर्चा शक्य
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा शक्य आहे. महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.