मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रदेशांचा आर्थिक आणि सिंचनाचा अनुशेष कित्येक वर्षे भरून निघालाच नाही. कोणतेही सरकार आले की घोषणा व्हायच्या, पण अनुशेष भरून निघायचा नाही. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मात्र मराठवाड्याचा अनुशेष भरून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने मोठ्या प्रमाणात निधी वाटपाचे काम सुरू केले आहे. सरकार स्वतः लोकांपर्यंत पोहोचत आहे. यात मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाचे निमित्त झाले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी या प्रदेशाला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषि महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य सरकार ४० हजार कोटींचे पॅकेज घोषित करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सिंचनासाठी २१ हजार कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १० ते १२ हजार कोटी, ग्रामविकास योजनेत १२०० कोटी, कृषी क्षेत्रासाठी ६०० कोटी, वैद्यकीय शिक्षणासाठी ५०० कोटी, महिला व बालकल्याण विभागासाठी ३०० कोटी, शालेय शिक्षणासाठी ३०० कोटी, क्रीडा क्षेत्रासाठी ६०० कोटी, उद्योगांसाठी २०० कोटी, सांस्कृतिक विभागासाठी २०० कोटी आणि नगरविकास योजनांसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
अखेर बैठक ठरली
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे तणावाची परिस्थिती असल्याने बैठक घ्यायची की नाही, याचा निर्णय होत नव्हता. मात्र गुरुवारी जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आता बैठक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सात वर्षांनंतर मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.
पूर्वीच्या योजना कागदावरत
छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होत असल्याने मराठवाडय़ाच्या हिताचे निर्णय घेऊन आठही जिल्ह्यांमधील नागरिकांना खुश करण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न असेल. सात वर्षांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ४० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, पण यातील अनेक योजना कागदावरच राहिल्या होत्या.
Maharashtra Cabinet Meet Marathwada Big Announcements
Fund Politics Package