मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर ३९ दिवसांनी मुहूर्त मिळाला आहे. तब्बल १६४ आमदारांचे समर्थन या सरकारला असतानाही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. मात्र, शिंदे गट आणि भाजप यांच्यात काही बाबींवर एकमत होत नव्हते. शिवाय शिवसेनेतील अंतर्गत वादाची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील दिला जात नव्हता. अखेर आज हा विस्तार थोड्याच वेळात होत आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता आणि असंतोष असल्याचे समोर येत आहे. बंडखोरी करतेवेळी अनेक आमदारांना मंत्रिपदाचे आश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला काही तास बाकी असतानाही शिंदे गटाची मंत्रिपटाची यादी अंतिम झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, थोड्याच वेळात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. काही निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी विचारविमर्श होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. म्हणजेच, काही निर्णय एकनाथ शिंदे यांनी परस्पर घेतले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढे काय होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Cabinet Expansion Shinde Group
Gulabrao Patil Eknath Shinde