मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सायंकाळी मंत्रालयात झाली. या बैठकीत अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात अभूतपूर्व राजकीय नाट्य गेल्या आठवड्याभरापासून रंगत आहे. शिवसेनेच्या बंडखोरांनी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आणले आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य करीत राज्यपालांनी उद्या ३० जून रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. तर, बंडखोर आमदार हे गुवाहाटीहून निघाले असून ते आता गोव्याला जात आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली.
या बैठकीत काय प्रस्ताव ठेवले जातात आणि मंजूर केले जातात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बहुमत चाचणी सिद्ध करण्यात अपयश आले तर ठाकरे सरकार पायउतार होणार आहे. अशा परिस्थितीत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विविध प्रस्ताव मांडले. त्यानुसार, उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करावे, अशी मागणी करण्यात आली. ती मान्य झाली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करावे, अशी मागणी शिवसनेने केली. हा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला. तो सुद्धा मान्य करण्यात आला आहे.
Maharashtra Cabinet Decision Change Name of Cities MVA Government Uddhav Thackeray