मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षम मंडळाच्यावतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्यावतीने ९ विभागीय मंडळांच्यावतीने लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २३ मार्च पर्यंत चालेल. तर, इयत्ता दहावीच्या परीक्षा १ मार्चपासून सुरू होतील आणि त्या २२ मार्च पर्यंत पूर्ण होतील. मंडळाने त्यांच्या वेबसाईटवर सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोकण या ९ मंडळातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी म्हटले आहे की, मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
ते ग्राह्य धरु नये
हे वेळापत्रक जाहीर करताना मंडळाने आवाहन केले आहे की, मंडळाच्या वेबसाईटवरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य वेबसाईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
तर १५ दिवसात कळवा
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्र्यपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे, तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे ओक यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी मंडळाची वेबसाईट : https://www.mahahsscboard.in/
Maharashtra Board SSC HSC Exam Schedule Declared
Education School Student