मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी उर्फ दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना जाहीर झाला असून नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर उद्या रविवार, दि. १६ रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सरकारमधील सर्व मंत्री व पक्षाचे महत्त्वाचे नेते, उपस्थित राहणार आहे. तसेच या खास कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण कार्यक्रम, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापन, आरोग्य शिबिर, समाज प्रबोधन व बाल संस्कार वर्ग यांसारखे अनेक मोलाचे कार्य दिले आहे. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देतो हे जास्त महत्त्वाचे ठरते असा धर्मजागृतीचा वसा त्यांनी लोकांपर्यंत मांडला. मानवता हाच धर्म असा लोककल्याणाचा मार्ग त्यांनी समोर ठेवला आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सन २०१४ त्यांना डॉक्टरेट म्हणजेच मानद पदवी देण्यात आली. २०१७ मधे पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले, तर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यापूर्वीही त्यांचे वडील श्रीनानासाहेब धर्माधिकारी यांना देखील महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला होता.
दरम्यान उद्याच्या सोहळ्याची नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेकडे मोठी जबाबदारी असून या पुरस्कार वितरण समारोहाला अंदाजे २० लाखापेक्षा जास्त लोक येतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. यासोबतच स्वच्छता, पाणी, वाहतूक कोंडी यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कारण या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहाणार आहेत.
आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन केले जाणार आहे. खारघरमधल्या सेंट्रल पार्कच्या मैदानावर ४०० एकर परिसरात आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार होणार आहे. समाज प्रबोधन, अध्यात्म, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा जाहीर केला आहे. त्यामुळे जवळपास २० लाख श्री सदस्य अनुयायी आणि सर्व सामान्य लोक या कार्यक्रमाला या मैदानावर उपस्थित राहतील त्या पार्श्वभूमीवर तयारी राज्य सरकारच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे सोहळा सर्वात मोठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालत आहेत.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाची जबाबदारी उदय सामंत, शंभूराज देसाई आणि रवींद्र चव्हाण या मंत्र्यांवर दिली आहे. कारण एवढ्या मोठ्या अशा महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा राजकीय फायदा सुद्धा सरकारला होणार आहे याची कल्पना दोन्ही पक्षांना आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण कोकणातील लाखो सदस्य त्यासोबतच त्यांना मानणारा वर्ग खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर येणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका तसेच लोकसभेच्या निवडणुका या सगळ्याचा विचार करता दोन्ही पक्षांना कोकणात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा असणार आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे समाजसेवक म्हणून कार्य करत असताना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आप्पासाहेबांना गुरु समान मानतात, देवेंद्र फडणवीस यांचे धर्माधिकारी हे चांगले स्नेही आहेत. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी आणि त्यांना मानणारा वर्ग पाहता हा सोहळा तेवढाच मोठा आणि भव्य करण्याचा पूर्ण प्रयत्न राज्य सरकारने करण्याचे नियोजन केले असून त्यातून कोकणवासियांचे मन जिंकण्याचा सुद्धा मानस आहे.
Maharashtra Bhushan Award Politics state Government