नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली.
प्रसिद्धीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. मानवता धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य हे श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरूच राहणार आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करत असल्याचेही श्री. धर्माधिकारी म्हणाले.
देशाचे, आईवडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय सेवा केली, हे प्रत्येकाने ठरविली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. देशसेवेबरोबर समाज सेवा करण्याचे काम मंत्री करीत आहेत. समाजसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान उभे केले. त्यासाठी प्रत्येकाने किमान पाच पाच झाडे लावायला हवेत. त्यामार्फत वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. देशातील प्रत्येक मानवाचे आरोग्य सुदृढ असावे व आनंद आयुष्य जगावे यासाठी आरोग्य शिबिर घेत आहोत. रक्तदान व थॅलेसिमेया रुग्णांसाठी रक्त पुरवठा ही पण एक समाजसेवा आहे. आजपासून प्रत्येकाने ही सेवा सुरु करावी. राज्य शासनाचे जलसंधारणाचे मोठे काम सुरू आहे. त्याद्वारे पाणी जिरविण्याच्या कामातही योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
समाजसेवेबरोबरच अंतःकरणाची स्वच्छता महत्त्वाची असून यासाठी प्रत्येकाने मन स्वच्छ करायला हवे. तसेच मनाला स्थिरता प्राप्त करण्यासाठी अंतःकरणातील अस्वच्छता बाहेर काढणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाने अंर्तःआत्माला स्मरुन काम केले तरच उत्तम सामर्थ्य प्राप्त होईल. समाजसेवेचे हे काम अखंड सुरूच राहणार आहे यासाठी प्रत्येकाने सत्कीर्ती वाढवावी व अपकीर्ती थांबवावी, असा उपदेशही श्री. धर्माधिकारी यांनी यावेळी दिला.
पुरस्काराची रक्कम
राज्य सरकारने यंदापासून या पुरस्काराची रक्कम २५ लाख रुपये एवढी केली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ही पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दान केली आहे. यातून गरजूंना मदत होईल, असे मत डॉ. धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
Maharashtra Bhushan Award Amount Dharmadhikari