मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
शनिवारी २४ ऑगस्ट रोजी राज्यात बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामकाजावर परिणाम दिसू शकतो.या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. चाकरमान्यांना या बंदचा फटका बसू शकतो. या बंद बाबत उध्दव ठाकरे यांनी आवाहन करतांना सांगितले की, ‘मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे. हा राजकीय पक्षांचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. कुणीही असं दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावा यासाठी हा बंद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवरील अत्याचार, तसेच गेल्या एका आठवड्यात अत्याचाराच्या १२ घटना घडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याची माहिती नंदुरबार येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राच्या लेकीसाठी, महाराष्ट्र बंद ! शनिवार २४ ऑगस्ट अशी पोस्ट टाकली आहे.