नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या १९ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. सत्ताधारी सरकारला खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांची तयारी सुरू आहे. मात्र, शिवसेना पक्षातील दोन्ही गट ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही आता एका कारणासाठी आमने सामने येणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्षाच्या कार्यालयावर दोन्ही गटांनी दावा केला आहे. त्यामुळे हे कार्यालय नक्की कुणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुमारे ६० वर्षापुर्वी नागपूर शहर हे मध्यप्रांत राज्याची राजधानी होते. सन १९६० मध्ये हे राज्य विभागले गेले आणि विदर्भ क्षेत्र महाराष्ट्रात जाणार म्हणून मूळ निवासी नागरिकांने प्रतिकार केला. कारण नागपूरने आपली राजधानीची स्थिती गमावली होती. परंतु, विदर्भ क्षेत्राच्या नागरिकांच्या समान विकासासाठी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने नागपूर करार केला. त्यानुसार, नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी बनविली गेली आणि राज्य विधानसभेचे आणि राज्य विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दरवर्षी आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्याची नागपूर करारानुसार सुरू झालेली परंपरा, संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.
नागपूरच्या विधानभवनात हिवाळी अधिवेशन येत्या १५ दिवसानंतर होणार असून या भागात असलेली सर्वच पक्षांची कार्यालये गजबजुन जाणार आहेत. परंतु नागपूर विधीमंडळ परिसरात असलेले शिवसेनेचे पक्ष कार्यालय आता नेमके कोणत्या गटाला मिळणार ? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे हे कार्यालय नेमके उद्धव ठाकरे गटाला मिळते की शिंदे गटाला याबाबत सर्वांनाच उत्सुकता असली तरी सध्या मात्र या पक्ष कार्यालयाच्या समोर असलेल्या फलक तथा बोर्डावर पडदा लावलेला दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि काही खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी उभी फूट पडली. या फुटीनंतर आता शिवसेना कोणाची हा राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेनेचे चिन्ह कोणत्या गटाला मिळणार यावर अजून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्हावरील वादावर दि. १२ डिसेंबरला सुनावणी करणार आहे. तर दुसरीकडे नागपूरला विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असून नागपूर विधानभवन परिसरात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. भाजपच्या बाजूला शिवसेनेचे कार्यालय आहे. पण सध्या शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात हे कार्यालय शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तरी प्रशासनाने या कार्यालयावर पडदा टाकलेला आहे.
दि. १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकरिता विधानभवन परिसरात रंगरंगोटीसह विविध कामे सुरू आहेत. काँग्रेस ,भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यालयाचे फलक स्पष्टपणे दिसत आहेत. तर शिवसेना पक्ष कार्यालयाच्या फलकावर मात्र ‘पडदा’ टाकण्यात आला आहे. त्यामुळे हे कार्यालय शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार यावरून अद्याप स्पष्टता नाही. सत्तेत असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातर्फे या कार्यालयावर दावा करण्यात येईल, याची शक्यता जास्त आहे. विशेष म्हणजे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाद्वारे सहजासहजी या कार्यालयावरून दावा सोडण्यात येणार नाही, असे सांगण्यात येते. येथील शिवसेना पक्ष कार्यालय शिवसेनेच्या दोन्ही पक्षांना विभागून देण्यात येईल अशीही चर्चा आहे.
यापूर्वी सन २०१९ मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले होते. गेली दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. आता दोन वर्षानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. या अधिवेशनासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यालय सज्ज होत आहे. पण शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला, की ठाकरे गटाला याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. सध्या तरी प्रशासनाने या कार्यालयाचा बोर्ड एका कापडाने झाकून ठेवलेला आहे. आता हा कापड केव्हा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.
Maharashtra Assembly Winter Session Shivsena Thackeray Shinde Fight
Party Office