मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा अधिकृत दौरा २१ एप्रिलपर्यंत होता. मात्र, हा दौरा अर्धवट सोडून ते अचानक मुंबईत येत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील राजकारणाच्या हालचालींना वेग आला असताना विधानसभा अध्यक्ष दाखल होत असल्याने नक्कीच काही तरी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग आला आहे. हे सारे सुरू असतानाच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वृत्त धडकले आहे.
नार्वेकर हे विधीमंडळातील सदस्यांसह सध्या जपानमध्ये आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते २३ एप्रिल या कालावधीत जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते जपान येथे आहेत. मात्र, राज्यातील राजकीय हालचालींना वेग येताच नार्वेकर हे जपान दौरा अर्धवट सोडून मुंबईत दाखल होत आहेत.
नार्वेकर मुंबईत येत असल्याने नक्कीच राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होण्याची चिन्हे यानिमित्ताने व्यक्त होत आहे. तसेच, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. त्यामुळे येते काही दिवस नक्की काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar Japan Return Mumbai