मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीतील बंडाने दोन्ही गटातील आमदारांची गोची झाली आहे. पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून नेमके आपण कुठल्या बाजूला बसावे, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. सत्ताधारी बाकांवर बसावे की विरोधी हा संभ्रम असल्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारल्याचे दिसून आले.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांच्या नेतृत्वात शरद पवार यांची भेट घेतली. तसेच सोमवारीदेखील शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षात एकी राहावी, त्यांच्यात ताटातुट होऊ नये, यासाठी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यांच्या पुत्राने शदर पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतल्याची माहिती आहे. भेटीगाठींचे हे सत्र सत्र सुरू असून या माध्यमातून शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, यासाठी प्रयत्न होताहेत. अशात दोन्ही गटांकडून ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आमदारांमध्ये बराच गोंधळ आहे. त्याची परिणिती आमदारांच्या अनुपस्थितीच्या स्वरूपात दिसून आली.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभात्याग
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे आज विरोधक सुरवातीलाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत धारेवर धरलं आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी प्रश्नांवर विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात पावसाची गंभीर स्थिती आणि दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. यानंतर थोड्याच वेळात विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला.
कामकाज सहभाग टाळला
राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार हे समोर आलेलं नव्हतं मात्र हे आज स्पष्ट होईल अशा चर्चा सुरू होत्या मात्र राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील कामकाजाकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे. कोणत्या गटात कोण आहे, हे दिसण्यापेक्षा आमदारांनी विधानसभा कामकाजात भाग घेणे टाळल्याची चर्चा सुरू आहे.
शरद पवारांची भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांचे आशीर्वाद घेतले. तसेच, आपण योग्य तो मार्ग काढा, अशी विनंती केली. मात्र, पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे सांगितले जात आहे.