मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्षभरापूर्वी शिवसेनासोबत घडलेल्या प्रकाराच्या पुनरावृत्ती आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत होत आहे. सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी कुणाचा व्हिप मानायचा असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. व्हिपच्या मुद्द्यावरून आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
एकीकडे शिवसेनेचे १६ आमदार अपात्र होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आता राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील संघर्ष पाहण्याजोगा ठरणार आहे. सोमवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, शिवसेनेप्रमाणेच या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या व्हीपचाही प्रश्न निर्माण होणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे व्हीप जितेंद्र आव्हाड आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाचे व्हीप म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल पाटील यांनी व्हीप बजावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे व्हीप कुणाचा हा वाद आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील आमदारांची संख्या ३६ पर्यंत पोहोचली आहे. शरद पवार यांच्याकडे १७ आमदार आहेत. अनिल पाटील यांनी आम्ही व्हीप बजावण्याची प्रक्रिया सुरू करत असून, अधिवेशन काळात उपस्थितीसाठी तसेच बैठकांसाठी हा व्हीप बजावणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या १२ आमदारांना शरद पवार गटाकडून नोटीसही पाठविण्यात आली आहे.
अद्याप राष्ट्रवादीतील फुटील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य केलेले नाही. त्यामुळे अधिवेशनात दोन्ही गट आमने-सामने येणार असून, शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्याप्रमाणेच अनिल पाटील यांना व्हीप म्हणून मान्यता मिळणार की जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप लागू होणार, याबाबत अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
शिंदे गटातही कुजबुज
भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली निवड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला त्यांची नव्याने निवड करावी लागणार आहे. त्यांची निवड झाल्यानंतरही त्यांचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का, हा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल परब यांना केला असता, न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला त्यांचा व्हीप लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचेही व्हीप स्वतंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.