विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्ती करण्यात आली आहे. यासाठी विधानभवनाच्या परिसरात ३ व ४ रोजी RT-PCR कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली.
हे प्रश्न गाजणार
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील कोरोना स्थिती, आर्थिक प्रश्न, महाविकास आघाडी सरकारचा कारभार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी, आरटीओतील गैरव्यवहार प्रकरण अशा विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. तर, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव अधिवेशनात ठेवला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा अध्यक्ष निवड
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सध्या प्रभारी अध्यक्षपद आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार का, याबाबत उत्सुकता आहे. याप्रश्नी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील पत्रव्यवहारही विशेष चर्चेचा ठरला आहे.
यांना प्रवेश नाही
अधिवेशनाला गर्दी होऊ नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात आली आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांना देखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे.
कोरोना निर्बंधांचे पालन
सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहे.