मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्यासपीठ कुठलेही असो रामदास आठवले यांची स्टाईल देशात सगळीकडे वापरली जाते. अगदी साहित्य संमेलन असो वा राजकीय व्यासपीठ असो. किंवा राज्याचे विधीमंडळ सभागृह असो. देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना टोला लगावण्यासाठी सुद्धा आज याच स्टाईलचा वापर केला.
काही दिवसांपूर्वी अजितदादांनी सभागृहातील भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले होते की ‘आमच्यावेळी शिवसेनेला चांगला निधी देण्यात आला होता, मात्र भाजपच्या सरकारमध्ये तुम्हाला केवळ १७ टक्के निधी मिळाला आहे. इतर ८३ टक्के निधी भाजपच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना देण्यात आला आहे.’ अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी केलेल्या या विधानाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले.
निधी वाटपात कुठलाही दुजाभाव झालेला नसल्याचे सांगत अजितदादांना खास आठवले स्टाईल टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी’. फडणविसांच्या या विधानाची सध्या राज्यात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आरपीआयचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्टाईलचा आधार घेऊन फडणविसांनी मोठे विधान केले असल्याचे राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.
फडणवीस यांनी आत्ताच्या आणि जुन्या सरकारच्या काळात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आकडेवारीचा फरक सांगितला. पण त्यांनी एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडावरून लगावलेला टोमणा जास्त चर्चेत आहे. फडणवीस यांचे भाषण सुरू असताना सभागृहात पूर्ण शांतता होती. मात्र त्यांनी आठवले स्टाईल उत्तर देताच जोरदार हशा पिकला.
आम्ही ३४ टक्के निधी दिला
अजितदादांनी आमच्या काळात शिवसेनेला जास्त निधी दिल्याचा दावा केला होता. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अर्थसंकल्पात केवळ १५ टक्के निधी शिवसेनेला मिळाला होता, असा दावा केला आणि आता आम्ही ३४ टक्के निधी शिवसेनेला दिला आहे, असे म्हटले.
Maharashtra Assembly Session Ajit Pawar Devendra Fadnavis