नाशिक – कोरोनाच्या या संकट काळात बोगस डॉक्टरांची मदत घेऊन आदिवासी भागात कोरोनासंबंधी औषधांचे किट वाटप करण्यात यावे, असा निर्णय खुद्द जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यास कडक आक्षेप घेत आहे. त्यामुळेच यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचे अंनिसने सांगितले आहे.
अंनिसने म्हटले आहे की, आदिवासी भागात अंधश्रद्धा फोफावण्यास व त्या अधिक बळकट करण्यास अनेक भोंदू व्यक्ती, बोगस डॉक्टर, भोंदू वैद्य अशा व्यक्तींची मोठीच भूमिका राहिली आहे. महाराष्ट्र अंनिसने याबाबत वेळोवेळी दखल घेऊन ,त्या-त्या जिल्हा प्रशासनाला अशा बोगस डॉक्टरां विरोधात प्रचलित कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याबाबत वारंवार लेखी विनंती करून, पाठपुरावा केलेला आहे. मात्र तरीही फार काही फरक पडलेला नाही.
मुळात आदिवासी भागात आणि इतरत्रही कोरोनाच्या अशा संभ्रमकाळात लोकांच्या असहायतेचा, अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनेक भोंदू, बोगस व्यक्ती पारंपरिकतेच्या नावाने वेगेवेगळे काढे, झाड-पाले, मंत्रतंत्र वगैरेच्या नादी लावतात. लोकांची लुटमार करीत असल्याचे वारंवार समोर येते. अशा भोंदू व्यक्ती, बोगस डॉक्टरांचा प्रचंड सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाआपत्ती निवारण विरोधी कायद्यान्वये अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. या निर्णयामुळे भोंदू बांबाना समाज मान्यता मिळेल व अंधश्रद्धेचा अधिक प्रसार होईल, असेही अंनिसने म्हटले आहे.
बोगस डॉक्टरांनी सातत्याने आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी खेळ करून त्यांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. त्यांचे आर्थिक शोषण केलेले आहे. अंधश्रद्वा पसरविल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कायदेशीर कारवाई करण्याचे सोडून त्यांच्या बोगस पदवीलाच ते मान्यता देत आहेत की काय, असा प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे. अशा बोगस डॉक्टरांना मदतीसाठी बोलावणे हा संबंधित कायद्याचा भंग आहे,असे महाराष्ट्र अंनिसचे मत आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात महाराष्ट्र अंनिस निषेध करीत आहे, त्यांनी हा निर्णय तत्काळ रद्द करीत असल्याचे जाहीर करावे, असे अंनिसचे डाॅ ठकसेन गोराणे, प्रा.डॉ.सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रा.सुशिलकुमार इंदवे, महेंद्र दातरंगे, नितीन बागुल यांनी सांगितले आहे.