मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला महिला व बालविकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी कृती समितीला बैठकीचे निमंत्रण दिले. ती बैठक यशस्वी रित्या पार पडली. बैठकीत नियमितपणे एकत्रित मानधन देणे, वाढीव मानधन त्वरित सुरू करणे, थकित सेवासमाप्ती लाभ अदा करणे, मानधनाच्या निम्मी मासिक पेन्शन, ग्रॅच्युइटी लागू करणे, नवीन मोबाईल, थकित भाडे, इंधन भत्ता, प्रवास भत्ता, रिचार्ज, परिवर्तन निधी त्वरित अदा करणे, मागील उन्हाळी सुट्टी, भाडे वाढ, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, छापिल रजिस्टर देणे, मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करणे, सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात होणाऱ्या वाढीची थकित रक्कम देणे, दुर्गम भागाचा भत्ता पुन्हा लागू करणे आदी मागण्यांवर कृती समितीचे निवेदन सादर करण्यात आले. मंत्र्यांनी चर्चा करून या प्रश्नांवर जून अखेरपर्यंत कृती समिती सोबत विभागाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले व प्रशासकीय पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव श्री अनूप यादव यांच्या सोबत लगेच भेट घडवून आणण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शिष्टमंडळाने लगेच नव्याने नियुक्त झालेले प्रधान सचिव श्री अनूप यादव यांची भेट घेतली. त्यांनी भरपूर वेळ देऊन प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. मानधन यापुढे वेळेवर मिळेल; भाडेवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवला आहे; थकित सेवासमाप्ती लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत नवीन मोबाईल देण्यात येणार आहे, पेन्शन, ग्रॅच्युइटी बाबत अभ्यास करून प्रस्ताव तयार केले जातील; सर्व थकित देयके लवकरच देण्यात येतील, आदी माहिती त्यांनी दिली. आजची चर्चा सकारात्मक झाली. परंतु आयुक्तांकडून आत्तापर्यंत अपेक्षित कार्यवाही न झाल्याबद्दल कृती समितीने खंत व्यक्त केली.
शिष्टमंडळात एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, अतुल दिघे, त्रिशिला कांबळे, संगीता कांबळे, राजेश सिंग यांचा समावेश होता. आजची चर्चा चांगली झाली असली तरी प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत त्यामुळे प्रकल्प व जिल्हा पातळीवर ठरलेली आंदोलने सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी करावीत व दबाव कायम ठेवावा असे आवाहन कृती समितीने केले आहे.