मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील विविध विमानतळांच्या कामकाजासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्यातील विविध विमानतळांची सद्यस्थिती आणि विकासाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीत नाशिक विमानतळाचा कुठलाही विषय चर्चेला आला नाही. नाशिकमध्ये सुरू असलेली विमानसेवा बंद पडल्याबाबत किंवा अन्य विषयावरही काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे नाशिकची पुन्हा उपेक्षाच करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (MADC) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यामार्फत संयुक्तरित्या विमानतळांचा विकास करावा. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तातडीने जागेचे अधिग्रहण करावे; याचबरोबर अमरावती येथील बेलोरा विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील विविध विमानतळांच्या कामकाजासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे एमएडीसी, उद्योग व नगरविकास विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, पायाभूत सुविधा वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, नगरविकास विभागाच्या सहसचिव प्रतिभा भदाणे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुरंदर विमानतळासंदर्भात तालुक्यातील परवानगी प्राप्त जागा निश्चित करुन तातडीने त्याचे अधिग्रहण करावे. शिर्डी विमानतळाचा प्रमुख विमानतळात समावेश झाल्याने केंद्र सरकारकडून विकासासाठी निधी प्राप्त होणार आहे. ३५० कोटी रूपये खर्च करून या विमानतळाचा विस्तार करावा, तसेच प्रवासी सुविधा तत्काळ निर्माण करावी, असेही ते म्हणाले. याचबरोबर, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, कराड, गोंदिया येथील विमानतळाच्या विकासासंदर्भातील कामे जलदगतीने करावी, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Maharashtra Airport Development Review Meet Nashik not Discuss