मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे.
राधाकृष्णन यांच्या विजयाची घोषणा होत असताना त्यांचा उल्लेख मुंबईचे, महाराष्ट्राचे म्हणून केला गेला. त्याअर्थाने महाराष्ट्राची एक व्यक्ती या पदावर आसिन झाली याचा मला अतिशय आनंद आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘श्री.राधाकृष्णन यांचे जीवन सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांचे शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील योगदान प्रेरणादायी आहे. राधाकृष्णन यांचा अनुभव आणि दूरदृष्टीचा अनेकांना लाभ होईल. त्यातून भारत नवी उंची गाठेल आणि जागतिक स्तरावर सशक्त स्थान प्राप्त करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आजवर राधाकृष्णन यांनी केलेले मार्गदर्शन अमूल्य राहीले आहे. यापुढेही श्री. राधाकृष्णन यांचा प्रवास लोककल्याणकारी आणि यशस्वी ठरावी, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.