मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांसाठी चांगले वृत्त आहे. ई – केवायसी केलेल्या राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू झाले आहे. २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मंत्री पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून निधी वितरणाची प्रक्रिया सुरु केली.
गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता शासनाने विशेष बाब म्हणून १५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणालीमार्फत या निधीचे वितरण सुरु आहे. आज मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांनी या निधी वितरणाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ई – केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली.
हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तसेच पुढील शुक्रवारपर्यंत आणखी २,५०,००० शेतकऱ्यांकरिता रु.१७८.२५ कोटी इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानाकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई – केवायसी करण्याचे मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
ही सेवा नि:शुल्क असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तसेच डीबीटी प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीदेखील तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांप्रती सजग असून शेतकऱ्यांकरिता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देखील सर्व तहसील ब जिल्हा यंत्रणांना मंत्री पाटील यांनी दिल्या.
210 crore 30 lakh rupees direct deposit in the bank account of 3 lakh farmers
Maharashtra 3 Lakh Farmers Government Aid Bank Account Deposit