मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण संचालनालयाने प्रत्येक जिल्ह्यातून २० पेक्षा कमी पटाच्या शाळांची माहिती मागविली असून राज्य सरकारने कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप होत आहे. याबाबत निर्णय झाल्यास महाराष्ट्रात १४ हजार ९८५ शाळांचे अस्तित्व लवकरच लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे.
२०१७ मध्येदेखील सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा या निर्णयाची पुनरावृत्ती होत आहे. राज्यातील १५ हजार शाळांमध्ये सरासरी १० इतकी विद्यार्थी संख्या गृहित धरली तरी एक लाख ४९ हजार ८५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र येत या निर्णयाविरोधात‘शिक्षण बचाव कृती समिती’तयार केली आहे.
कृती समितीचे राज्य समन्वयक मधुकर काठोळे याविषयी म्हणाले, “२०१७ मध्ये सरकारने असा प्रयोग केला होता. तो आम्ही आंदोलनाने हाणून पाडला होता. शनिवारी केजी टू पीजी सर्व संघटना, पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञ यांची सभा पुणे येथे आयोजित केली आहे. या सभेत या मुद्द्यावर चर्चा केली जाईल.”
दरम्यान, शाळा बंद झाल्यास शिक्षकांसमोर बेरोजगारीचे मोठे संकट ओढवणार आहे. २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद झाल्यास सुमारे १५ हजार शाळांमधील १८ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. यापूर्वी राबविण्यात आलेल्या समायोजन प्रक्रियेतील घोळ लक्षात घेता, एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांचे समायोजन करताना शिक्षण खात्याची दमछाक होऊ शकते.
नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शाळा बंद करण्याच्या कार्यवाहीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा, अशी मागणी केली आहे.
२० पेक्षा कमी पटाच्या जिल्हानिहाय शाळा
कोकण विभाग : मुंबई ११७, पालघर ३१७, ठाणे ४४१, रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, रायगड १,२९५.
नाशिक विभाग : नाशिक ३३१, जळगाव १०७, अहमदनगर ७७५, धुळे ९२, नंदूरबार १८९.
पुणे विभाग : पुणे १,१३२, सातारा १,०३९, सांगली ४१५, कोल्हापूर ५०७, सोलापूर ३४२,
औरंगाबाद विभाग : औरंगाबाद ३४७, बीड ५३३, जालना १८०, लातूर २०२, नांदेड ३९४, उस्मानाबाद १७४, परभणी १२६, हिंगोली ९३.
नागपूर विभाग : नागपूर ५५५, गोंदिया २१३, गडचिरोली ६४१, चंद्रपूर ४५१, वर्धा ३९८, भंडारा १४१
अमरावती विभाग : अमरावती ३९४, अकोला १९३, बुलडाणा १५८, वाशिम १३३, यवतमाळ ३५०.
Maharashtra 14 Thousand School Closed Soon