मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वायू प्रदूषण व ग्रीनहाऊस उत्सर्जनाचा अभ्यास करणे आणि ते कमी करण्यासाठी सक्षम धोरणात्मक आराखडा तयार करण्याकरिता महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) आणि क्रेडाई-एमसीएचआय (CREDAI-MCHI) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराद्वारे महाप्रीत, विशेषत: मुंबई मेट्रो पॉलिटीन रिजन (MMR) मधील इमारत बांधकामे व पूर्ण झालेल्या इमारतीमधून होणाऱ्या वायू प्रदूषण व ग्रीनहाऊस गॅसच्या (GHG) उत्सर्जनाचा वैज्ञानिक अभ्यास करेल. या अभ्यासानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी सक्षम धोरणात्मक आराखडा तयार करणे हे उद्दीष्ट पूर्ण होणार आहे.
सामंजस्य करारावेळी महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले की, हा अभ्यास शहरी वायू प्रदूषणात इमारत बांधकाम उपक्रमामुळे होणारे प्रदूषण तपासण्यासाठी व त्यांचे प्रमाण निश्चित करणे. तसेच योग्य तांत्रिक साधनांचा व व्यवस्थापनाचा वापर करुन हे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सादर करण्यास उपयुक्त ठरेल. या अभ्यास अहवालात शिफारस करण्यात आलेल्या बाबींमुळे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास निश्चितपणे यश येईल.