नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमच्या कामासाठी ०५ व ०६ डिसेंबर २०२२ दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे ०४ ते ०६ डिसेंबर दरम्यान अप-डाऊन मार्गावरील तब्बल ३८ गाड्या रद्द व १८ गाड्यांचा मार्ग बदलावा लागणार आहे. या निर्णयामुळे दादरला जाणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
येत्या ०६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादर चैत्यभूमीला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सदर मेगा ब्लॉक तात्काळ पुढे ढकलावा, किंवा मध्य रेल्वेने विदर्भ व राज्यातील इतर भागांतून मुंबईला येण्यासाठी ज्या प्रकारे १४ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे, त्याच धर्तीवर भुसावळ विभागानेही विशेष गाड्यांचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मा. रेल्वे प्रबंधक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन यांना निवेदन दिले आहे. या वेळी मा. रेल्वे प्रबंधकांनी ही बाब वरिष्ठांना कळवून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन मनसे शिष्टमंडळास दिले आहे.
Mahaparinirvan Din Railway Megablock Citizen Complaint