मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समस्त महानुभाव संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी वर्ष साजरे करत आहे. चक्रधर स्वामीचे कार्य त्यांचे साहित्य व त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्ताने महानुभाव संप्रदाय समाजाने ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. तसेच या मागण्यांसंदर्भात बैठकदेखील घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.
मराठीतील पहिला ग्रंथ ‘लीळाचरित्र’ मानला जातो. त्यानिमित्ताने मराठी विद्यापीठ रिद्धपूरला व्हावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. या मागणीचा देखील शासन सकारात्मक विचार करेल. रिद्धपूर विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे. रेल्वेसंदर्भातही शिफारस केली आहे. ‘लीळाचरित्र’ रिद्धपूर येथे लिहिले गेल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या मागणीच्या संदर्भात शासनाने समिती गठित केली होती. तिचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आगामी काळात रिद्धपूरला मराठी विद्यापीठ करण्यासंदर्भात शासन गांभीर्याने विचार करेल. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले
Mahanubhav Sampraday Demands DYCM Fadanvis Commitment