नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृती तथा हिंदू धर्म संस्कृती टिकवण्याचे कार्य या धर्मातील अनेक पंथांनी केले , त्यामध्ये महानुभाव पंथाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. या पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी संपूर्ण मानव जातीला तथा जगाला समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला, तसेच या संमेलनात पंथाच्या मागण्या तथा ठराव मांडण्यात आले, त्याचा मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल, इतकेच नव्हे तर राज्य सरकारशी देखील याबाबत चर्चा करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले.
श्री चक्रधर स्वामी अष्टशताद्बी जन्मोत्सावानिमित्त तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजन डोंगरे वसतीगृह मैदानावर करण्यात आले आहे. या संमेलाना च्या समारोपप्रसंगी डॉ. कराड बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपाध्य कुलाचार्य महंत वर्धनस्थ बाबा बिडकर, आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, कविश्वर कुलाचार्य विद्वांस बाबा, महंत कारंजेकर बाबा, संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, माजी आमदार बाळासाहेब सानप, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, आमदार सुनील भुसारा यांच्यासह संत, महंत, तपस्विनी, पुजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी यांना चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नव्हती, त्यामुळेच त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवत सर्वसामान्य जनतेला खऱ्या धर्माची शिकवण दिली. सर्व माणूस हा समान आहे, स्त्री शूद्र यांना देखील धर्म आणि ईश्वर प्राप्तीचा अधिकार आहे, असा संदेश श्री चक्रधर स्वामी यांनी दिला. धर्माची दारे त्यांनी अखिल मानव जातीसाठी खुली केली, असेही डॉ कराड म्हणाले.
डॉ. कराड म्हणाले की, माणुसकीचे महत्त्व हे त्याच्या कर्मावर त्याच्या वागण्यावर आणि समाजसेवेवर अवलंबून असते. समाज सेवा केली तरच खरी ईश्वर प्राप्ती होते. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, हेच आपल्या धर्म पंथाचे तत्वज्ञान आहे. महानुभाव पंथ हा अहिंसा वादी पंथ असून अहिंसा परमो धर्म हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. ईश्वर सर्व व्यापी आहे, ईश्वराचे स्वरूप हे आपल्या भक्ती आणि कर्माने ओळखता आले पाहिजे, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे महानुभाव पंथाच्या मागण्या रास्त असून श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान गुजरात येथील भडोच तथा भरवस नगरी येथील हे सर्वांसाठी खुले पाहिजे, हा प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे अन्य मागण्याचाही निश्चित विचार केला जाईल, या मागण्यांसाठी आपला दूत म्हणून मी प्रयत्न करणार आहे, कारण कोणतेही पद हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सोयी सुविधांसाठी वापरले पाहिजे अशी आमच्या सरकारचे धोरण आहे. नवभारत घडविण्यासाठी आणि भारताला पुन्हा सर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार प्रयत्न करत आहे. संतांच्या आशीर्वाद त्यासाठी लाभलेला असून भारत विश्व गुरु म्हणून निश्चितच वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी गुजरात सरकारचे मंत्री जितूभाई चौधरी यांनीही आपले विचार मांडले. श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थानाचा प्रश्न निश्चितच सोडविला जाईल, असे आश्वासन चौधरी यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण मंचचे राष्ट्रीय संयोजक शरदराव ढोले यांनीही आपले विचार मांडले. यावेळी ते म्हणाले की, महानुभाव पंथाचे कार्य महान आहे, देश, हिंदुत्व आणि धर्म जिवंत ठेवण्यासाठी महानुभाव पंथाने मोलाचे योगदान दिले आहे. महानुभाव पंथ हा श्रीकृष्णाची भक्ती करणारा पंथ असून श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान हे संपूर्ण भारत देशासाठी नव्हे तर जगासाठी अत्यंत मोलाचे आहे, असेही ते म्हणाले धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र आले तर देश परत वैभव आला असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी संमेलनाचे संयोजक दिनकर पाटील यांनी विविध ठराव मांडले.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव, अखिल भारतीय महानुभाव संमेलनात शासनाकडे मांडण्यात येणारे ठराव आणि मागण्या अशा:
1 ) भरवस (भडोज गुजरात राज्य ) येथील श्री चक्रधर स्वामींची जन्मभूमी (विशाल देव राजांचा राजवाडा) महानुभाव अनुयायांना दर्शनासाठी मुक्त करणे.
2 ) मराठीचे आद्य उद्गाते श्री चक्रधर स्वामी यांच्या जन्मदिनी सार्वजनिक सुट्टी मिळणे.
3 ) श्री चक्रधर स्वामींचे प्रमुख तीर्थस्थान श्री क्षेत्र जाळीचा येथे प्रतिवर्षी शासकीय महापूजा होणे.
4 ) महाराष्ट्रातील श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थ स्थानांची शासन दरबारी शासनाद्वारे नोंद होणे.
5 ) महानुभाव संप्रदायी संत व भाविकांसाठी प्रत्येक गावात दफन विधीसाठी जागा मिळणे.
6 ) मराठी भाषेच्या विकास व समृद्धीसाठी श्री क्षेत्र वृद्धीपुर येथे मराठी भाषा विद्यापीठ मान्यता देणे.
7 ) सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अष्टशताब्दी जन्मोत्सव शासन दरबारी साजरा करावा.
महानुभाव पंथाच्या विविध ठरावांचे वाचन सुरू असताना उपस्थित हजारो भाविकांनी पंचकृष्ण नावाचा जयघोष केला. याप्रसंगी दत्ता गायकवाड आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत चिरडे बाबा यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला संत, महंत आणि राजकीय नेते पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. महानुभाव पंथाच्या सप्तग्रंथांचे प्रकाशन तसेच अन्य धार्मिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी स्वागत समितीच्या वतीने राजकीय मान्यवर आणि संत महंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी उदय सांगळे, प्रकाश शेठ घुगे ( सचिव ), प्रकाश शेठ ननावरे (खजिनदार ), प्रभाकर आप्पा भोजने, अरुण महानुभव, विश्वास का. नागरे, छबू नागरे,लक्ष्मणराव जायभावे, भास्करराव गावित, उदयभाऊ सांगळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास स्वागत समिती सिताराम पाटील आंधळे, अरुण सोनूपंत भोजने, राजेंद्र जायभावे. संजय सोनुपंत भोजने, भास्करराव सोनवणे, सागर शांतीलाल जैन, योगेश मस्के, नंदू हांडे, किरण वसंत मते, सुरेश भाऊ डोळसे, अनिल जाधव, श्याम राजाराम कातोरे, प्रदीप वैद्य, मुकुंद बाविस्कर, अनिल जाधव, साहेबराव आव्हाड, रवी पेखळे, शांताराम खांदवे, श्याम राजाराम कातोरे, प्रदीप वैद्य, किरण भडांगे, अमोल दिनकर पाटील, अनिल घुगे, वाल्मीक मोकळ, विकी भुजबळ, सुरेश नाना भोजने आदि उपस्थित होते.
Mahanubhav Sammelan Minister Bhagwat Karad