इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बाघंबरी मठातील महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येनंतर सुमारे वर्षभरानंतर त्यांची बेडरूम उघडण्यात आली. सीबीआय, पोलीस, प्रशासन आणि बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महंत बलवीर गिरी यांच्याकडे सर्व ऐवज सुपूर्द करण्यात आला. खोलीच्या चाव्याही त्यांच्याकडे देण्यात आल्या असून ते दोन-तीन दिवसांत या खोलीत रहायला येतील.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे सचिव महंत नरेंद्र गिरी यांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्यांची बेडरुम बंद होती. सीबीआय, पोलिस, प्रशासन आणि बँक अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने आज आश्रमातील महंतांची बेडरुम उघडली.
घटनास्थळी उपस्थित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतांच्या खोलीत ३ कोटी रुपये रोख, विद्यमान महंत बलवीर गिरी यांच्या नावाचे मृत्यूपत्र, १३ काडतुसे, कोट्यवधींचे दागिने आणि १० क्विंटल देशी तूप सापडले आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास सीबीआय, पोलिस आणि प्रशासनाचे पथक मठात पोहोचले. हे पथक पहिल्या मजल्यावर असलेल्या महंतांच्या बेडरूममध्ये गेले. रात्री आठ वाजेपर्यंत पथकाची पाहणी सुरू होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी रुपये मोजण्यासाठी एका मशीनचा वापर करावा लागला. या खोलीत रोख रक्कम, मृत्यूपत्र, काडतुसे, दागिने आणि इतर वस्तू होत्या. रोख रक्कम मिळाल्यावर बाघंबरी मठाचे महंत बलवीर गिरी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. खोलीची चावी सापडल्याचे त्यांनी सांगितले. दोन-तीन दिवसांत या खोलीत ते प्रवेश करणार आहेत.
Mahanta Narendra Giri Room CBI Cash Gold Found
Prayagraj CBI Bank Police Ashram