प्रयागराज (उत्तर प्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे कारण अखेरचे मृत्यूपत्र (वारसाहक्क करारनामा) असू शकते, असे बोलले जात आहे. महंताना वारसाहक्काची गरज का भासली? पूर्वीच्या उत्तराधिकार्यावरून त्यांचा विश्वास कधी आणि का उडाला? या संपूर्ण रहस्याला त्यांचे प्रिय शिष्य आनंद गिरी यांच्या ऑस्ट्रेलिया कनेक्शनशी जोडून पाहिले जात आहे. याच मृत्यूपत्राला बदलण्यासाठी महंतांवर दबाव टाकला जात होता. अखेरचे मृत्यूपत्र बदलण्यासाठी त्यांच्यावर कोण सक्ती करत होते, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
मठाच्या संपत्तीबाबतचे महंतांचे अखेरचे मृत्यूपत्र या वादाचे मूळ कारण सांगितले जात आहे. सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या आखाडा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून नरेंद्र गिरी शक्तीशाली होते. तसेच अफाट संपत्ती असलेल्या गादीवर विराजमान असल्यामुळे त्यांचे समाजात वजन होते. २००० मध्ये प्रथमच त्यांचे शिष्य झालेले राजस्थानच्या भिलवाडा येथील रहिवासी अशोक कुमार चोटिया यांनी निरंजनी आखाड्यात संन्यासाची दीक्षा घेतली. नंतर त्यांनी आनंद गिरी असे नाव धारण केले.
मठाच्या संपत्तीच्या वादात अनेक वेळा साहस दाखवून ते महंत नरेंद्र गिरी यांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरले. यामुळेच २०११ मध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना उत्तराधिकारी बनविले. त्यानंंतर त्यांनी आनंद यांना वारसाहक्क दिला.
आनंद गिरी यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांमुळे दोघांमधील अंतर वाढत गेले. त्यांच्या संबंधांमध्ये २०१९ च्या कुंभमेळ्यादरम्यान तेढ निर्माण झाली. ऑस्ट्रेलियामध्ये दोन परदेशी महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपाखाली आनंद गिरी यांना अटक करण्यात आली होती. या आरोपांमुळे गुरू-शिष्याचे संबंध अधिकच ताणले गेले. बदनामी झाल्यामुळे महंत चांगलेच दुखावले गेले.
याच कारणांमुळे ४ जून २०२० मध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांच्या नावावर केलेला वारसाहक्क मागे घेऊन बलवीर गिरी यांच्या नावावर दुसरे वारसाहक्क करारपत्र केले. याच दुसर्या वारसाहक्काबाबत त्यांनी सुसाइड नोटमध्ये उल्लेख केला आहे. दुसर्या वारसाहक्क करारपत्राला बदलण्यासाठी महंतांवर दबाव टाकला जात होता, असे बोलले जात आहे. या दुष्कर्मात कोण कोण सहभागी झाले, हा चौकशीचा भाग आहे.